महाराष्ट्र केसरी कुस्तीपटू पंजाब पोलिसांच्या ताब्यात

महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी कुस्तीपटू सिकंदर शेखला पंजाब पोलिसांनी शस्त्र तस्करी प्रकरणी अटक केली आहे

सविस्तर वृत : महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी ठरलेल्या कुस्तीपटू सिकंदर शेख याच्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. कुस्तीपटू सिकंदर शेखला पंजाब पोलिसांनी शस्त्र तस्करी प्रकरणी अटक केली आहे. पपला गुर्जर टोळीला शस्त्रपुरवठा रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. याप्रकरणी कुस्तीपटू सिकंदर शेखसह पंजाब पोलिसांनी चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईमुळे कुस्तीक्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,  मोहाली पोलिसांनी आंतरराज्यीय शस्त्रपुरवठा  करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. मोहालीच्या सीआयए पथकाने अत्यंत धडाकेबाज कारवाई करत या टोळीतील चार सदस्यांना अटक केली असून, त्यांच्याकडून पाच अवैध बंदुका  जप्त करण्यात यश मिळवले आहे. या अटक केलेल्या आरोपींमध्ये राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू सिकंदर शेख याचाही समावेश असल्याने खळबळ उडाली आहे. ही टोळी शस्त्र तस्करी, खून आणि खंडणीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

एसएसपी हरमन हंस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अटक करण्यात आलेले आरोपी हरियाणा आणि राजस्थानमध्ये सक्रिय असलेल्या विक्रम उर्फ पपला गुर्जर गँगशी थेट जोडलेले आहेत. हे आरोपी उत्तर प्रदेशातून शस्त्र आणून पंजाब आणि आसपासच्या भागात विक्री करत होते. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी कारवाई केली आणि तपासादरम्यान समजले की, तिघे आरोपी गुन्हेगार पार्श्वभूमीचे आहेत. मात्र, महाराष्ट्रातील सिकंदर शेख याचा गुन्हेगारी रेकॉर्ड आहे का, याची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधला गेला आहे.

सिकंदर शेख हा कोल्हापूरातील गंगावेश तालमीत सराव केलेला कुस्तीपटू असून, दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र केसरी ही मानाची गदाही पटकावली होती. पण आता त्याच्या या अटकेमुळे कुस्तीविश्वात आणि महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. शेख हा बीए पदवीधर असून त्यानं आर्मीमध्ये क्रीडा कोट्यातून भरती झाला होता.पण काही काळानंतर नोकरी सोडत कुस्ती क्रीडा प्रकारात पुन्हा ऍक्टिव्ह झाला होता.

पंढरपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना, “मी जनतेच्या मनातील महाराष्ट्र केसरी आहे” असे वक्तव्य केले होते. भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूरजवळ भीमा साखर कारखान्यावर भीमा केसरी कुस्ती स्पर्धाचे आयोजन केले होते, तेव्हा त्याने हे विधान केले होते. मात्र, आज अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात त्याला अटक झाल्याने त्याच्या फॅन्सना मोठा धक्का बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *