गोव्यात नाईट क्लबला आग लागून 23 जणांचा होर पोळून मृत्यू पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण

सविस्तर वृत : गोवा एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. देशभरातून लाखो पर्यटक गोवा फिरण्यासाठी येत असतात. आता नाताळ जवळ येत आहे. त्यामुळे गोव्यातील ही गर्दी आणखी वाढणार आहे. मात्र, त्याआधीच गोव्यात एक भीषण दुर्घटना घडली आहे. नाईट क्लबला आग लागली. यात अनेकांचा होरपळून मृत्यू झाला आहे
आगीची माहिती मिळताच, मुख्यमंत्री प्रमोद सावंत घटनास्थळी पोहोचले. मुख्यमंत्री सावंत यांनी पत्रकारांना सांगितले की, २३ जणांपैकी तीन जण भाजल्याने आणि उर्वरित लोक गुदमरल्याने मृत्युमुखी पडले. प्राथमिक माहितीवरून असे दिसून येते की नाईटक्लबने अग्निसुरक्षा नियमांचे पालन केलं नव्हतं. सावंत म्हणाले की, क्लब व्यवस्थापन आणि सुरक्षा नियमांचे उल्लंघन करूनही क्लबला काम करण्यास परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
भाजप आमदार मायकल लोबो यांनी सांगितले की, या घटनेत 23 जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यात तीन महिला आणि 20 पुरुषांचा समावेश आहे. काही पर्यटक होते, तर बहुतेक स्थानिक लोक रेस्टॉरंटच्या तळघरात काम करत होते. गोव्यातील इतर सर्व क्लबचे सुरक्षा ऑडिट केले पाहिजे, जे अत्यंत महत्वाचे आहे. पर्यटक नेहमीच गोव्याला एक अतिशय सुरक्षित ठिकाण मानतात, परंतु आगीची घटना खूपच अस्वस्थ करणारी आहे आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत. पर्यटकांची आणि या ठिकाणी काम करणाऱ्यांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे, असं मायकल लोबो म्हणाले
नाईटक्लबमध्ये रात्री १२:०० वाजता सिलेंडरचा स्फोट झाला. आगीमुळे क्लबमध्ये मोठी घबराट पसरली आणि लोक इकडे तिकडे पळू लागले. आग आटोक्यात आणेपर्यंत २३ जणांचा मृत्यू झाला. काही जण भाजल्याने मरण पावले, तर काही जण गुदमरल्याने मरण पावले. मध्यरात्रीनंतर रोमियो लेनजवळील बर्च येथे ही आग लागली. हे ठिकाण नाईट क्लब आणि पार्टीसाठी लोकप्रिय आहे.
