जोगेश्वरी मधील कोकण नगर गोविंदा पथकाने केला दहा थराचा मानवी मनोरा रचून ठाण्यात विश्वविक्रम केला

सविस्तर वृत : ठाणे शहर दहीहंडी उत्सवासाठी पंढरी म्हणून ओळखले जाते. येथील दहीहंडी उत्सवात दरवर्षी अनेक गोविंदा पथके सहभागी होतात आणि मानवी मनोऱ्यांच्या माध्यमातून आपले कौशल्य दाखवतात. यंदा कोकण नगर गोविंदा पथकाने 10 थर रचून ठाण्याच्या या परंपरेला एका नव्या उंचीवर नेले आहे. याशिवाय, जय जवान आणि आर्यन्स गोविंदा पथकांनीही 9 थर रचून आपली छाप पाडली आहे.ठाण्यातील दहीहंडीची परंपरा ही गोविदा पथकानसाठी माहेर घर आहे.
संस्कृती युवा प्रतिष्ठानचा हा दहीहंडी उत्सव ठाण्यातील मानाचा उत्सव मानला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही या उत्सवात अनेक गोविंदा पथकांनी सहभाग घेतला, परंतु कोकण नगर गोविंदा पथकाने सर्वांचे लक्ष वेधले. सकाळी 10 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 44 च्या पटांगणावर हा उत्सव रंगला. यंदाच्या उत्सवाची थीम बॉलिवूडच्या ‘शोले’ चित्रपटाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ठेवण्यात आली होती, ज्यामुळे उत्सवाला सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक रंगत आली
कोकण नगर गोविंदा पथकाने यंदा 10 थरांचा मानवी मनोरा रचून एक नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. यापूर्वी जय जवान गोविंदा पथकाने 2012 मध्ये 9 थर रचून विश्वविक्रम नोंदवला होता, परंतु कोकण नगर पथकाने यंदा हा विक्रम मोडला. या थरारक कामगिरीसाठी पथकाने अनेक महिने कठोर सराव केला होता. 10 थरांचा मनोरा रचताना गोविंदांनी दाखवलेली शिस्त, समन्वय आणि धाडस यामुळे उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि सर्व स्थराकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
प्रताप सरनाईक यांनी या यशाबद्दल कोकण नगर गोविंदा पथकाचे अभिनंदन केले आणि सांगितले, “हा विश्वविक्रम ठाण्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. संस्कृती युवा प्रतिष्ठान नेहमीच गोविंदांच्या धाडसाला आणि कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध आहे. यंदा 10 थरांचा विश्वविक्रम रचून कोकण नगर पथकाने इतिहास घडवला आहे.
हा विश्वविक्रमी क्षण पाहण्यासाठी लाखो लोकांनी गर्दी केली होती. स्थानिक नागरिकांपासून ते राजकीय, अनेक सिने कलाकार आणि नेत्यांपर्यंत सर्वांनी या उत्सवाचा आनंद लुटला आणि या विश्व विक्रमाचे साक्षीदार झाले आहेत
