मुंबई गोवा महामार्गावरून जात असाल तर थांबा.

मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या गणेश भक्तांचे ट्राफिकमुळे हाल…

साविस्तर वृत्त: गणेशोत्सव म्हटलं कि, हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. खास करून गणेशोत्सव हा मुंबई आणि कोकणात तसेच पुण्यात मोठ्या उत्सवात तसेच थाटामाटात साजरा केला जातो. कोकणात तर ह्या सणाला विशेष महत्व आहे, कारण ह्या सणाला कोकणातील चाकरमानी हे वर्षभरापासून सुट्टीची आणि गणेशोत्सवाची तयारी करत असतात आणि उत्सव जवळ आला कि, दोन-तीन दिवस आधीच आपल्या गावी मोठ्या आनंदाने जात असतात. गावी जाण्यासाठी मूळ मार्ग हा मुंबई गोवा महामार्ग हाच आहे. अनेक वर्ष मुंबई गोवा महामार्गाची अवस्था बघता तो आजही खड्डेमय आहे. अनेक सरकारे येऊन फक्त मुंबई गोवा महामार्गाला घेवून पूर्ण करण्याची आश्वासने देतात. अनेक कोटी खर्च करून सुद्धा हा महामार्ग अजूनही बनविला गेला नाही. त्यामुळे गणेशोत्सव जवळ आला की, सरकारकडून तात्पुरते डागडुजीकरण करून महामार्ग कोकणातील गणेशोत्सवाला जाणाऱ्या प्रवाश्यांना प्रवास करण्यास दिला जातो. ही डागडूजीकरण तात्पुरती असल्याकारणाने गणेश उत्सवाच्या काळातच सरकारची रस्त्याबद्दलची पोल खोलत असते. रस्त्यांच्या कामांमुळे आणि खड्ड्यांमुळे मुंबई गोवा महामार्गावर दररोज अपघात होत असतात. अनेक संस्थानी सरकारला ह्या बाबी निदर्शनास आणून देखील सरकार नेहमी प्रमाणे ह्याकडे दुर्लक्ष करीत असते. दरवर्षी प्रमाणे मुंबईहून अनेक गणेश भक्त लाखोंच्या संख्येने आपल्या गावी जात असतात.

७ सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवासाठी भक्त गण दोन-चार दिवस आधीच आपल्या गावी निघाले आहेत, तसेच ह्या महामार्गावर गणेश उत्सवासाठी जाणाऱ्या कोकणातील एस. टी च्या जादा गाड्या सोडण्यात येतात. तसेच आपल्या गावी जाण्यासाठी लोकं आपल्या खाजगी वाहनांना सुद्धा घेवून निघतात. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात ट्राफिक जामच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. पळस्पे फाटा सुटला कि, कोकणात जाताना ट्राफिकच्या समस्यांना तोंड देत नागोठणे, सुकळी खिंड, कोलाड, तसेच माणगाव या ठिकाणी ट्राफिक जामच्या समस्या प्रवाश्यांना सतत उद्भवत असतात. माणगावच्या पुढे लोणेरे फाट्या आधी महामार्गाचे काम चालू असल्याने तेथे देखिल ट्राफिक जाम होत आहे. त्यातच पावसाच्या अधून मधून येणाऱ्या सरी चिखलाचे साम्राज्य तयार करीत आहे, त्यामुळे वाहने सावकाश चालवण्यासाठी ट्राफिक पोलीसांकडून वारंवार प्रवाश्यांना सूचना दिल्या जात आहेत. मुंबई गोवा महामार्गावरची ट्राफिक लक्षात घेता अनेक कोकणवासी मुंबई एक्स्प्रेसचा देखील वापर करीत आहेत. त्यामुळे तिकडे देखील वाहतुकीवर परिणाम दिसून येत आहे.

बोर घाट पोलिस वाहतूक मुंबई आणि पुण्यावरून येणाऱ्या ट्राफिकला हाताळत आहेत. मुंबई गोवा महामार्गावर सुद्धा कशेडी बोगद्याच्या आधी ट्रकचा अपघात झाल्यामुळे तेथे देखील ट्राफिक जामची समस्या उद्भवत आहे आणि हीच ट्राफिक जामची अवस्था भरणे नाक्यावर पण दिसून येत आहे. पोलिसांना ट्राफिक हलवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. पुढे संगमेश्वर,लांजा,राजापूर,कणकवली येथे ट्राफिक जामच्या समस्यांना तोंड देत १२ ते १५ तासानंतर मुंबईहून कोकणात आपल्या गावी जाण्यासाठी येवढा मोठा प्रवास गणेशोत्सवाच्या काळात कोकणातील चाकरमान्यांना करावा लागत आहे.

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *