दिल्लीमध्ये लाल किल्ल्याजवळ सायंकाळी एन गर्दी च्या वेळी कार मध्ये मोठा स्फोट दिल्ली हाय अलर्ट वर स्फोटाचं कारण अद्याप समजले नाही

सविस्तर वृत : राजधानी दिल्लीमधील लाल किल्ला परिसरात उभ्या असलेल्या कारमध्ये मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या कारमधील स्फोट एवढा मोठा होता की आजूबाजूच्या इमारतीच्या काचा फुटलेल्या आहेत. विशेष म्हणजे कारमध्ये स्फोट झाल्यानंतर बाजूला उभ्या असलेल्या दोन कारला आग लागलेली आहे. या घटनेने दिल्लीमध्ये सध्या खळबळ उडाली असून लोकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात एक कार उभी होती. याच कारमध्ये हा स्फोट झालेला आहे. स्फोट झाल्यानंतर लोकांमध्ये घबराट निर्माण झाली. लोकांनी घटनास्थळी जात गर्दी केली. ही गाडी लाल किल्ला परिसरातील मेट्रोच्या गेट क्रमांक एकवर उभी होती. स्फोट झाल्यानंतर काही काळासाठी येथे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. ही घटना समोर येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली
ही घटना समोर आल्यानंतर लगेचच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. कारमधील स्फोटानंतर आग लागली. हीच आग विझविण्याचा प्रयत्न अग्निशामक दलाकडून केला जात आहे. दुसरीकडे बॉम्ब शोधक पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. कारमध्ये स्फोट नेमका का झाला? यामागे काही घातपाताचा उद्देश तर नव्हता ना? या सर्व प्रश्नांची उत्तरं आता शोधली जाणार आहेत.
धक्कादायक म्हणजे आजच दहशतवादविरोधी कारवाई करताना पोलिसांना मोठं यश मिळाले होते. हरयाणातील फरिदाबादमधील एका डॉक्टरच्या घरावर जम्मू काश्मीर पोलिसांनी छापा मारला. या छाप्यात अंदाजे ३०० किलो आरडीएक्स (स्फोटके) जप्त केले आहेत. त्याशिवाय, एके-४७ रायफल आणि जिवंत काडतूसे मिळाले होते. कारवाई करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आदिल अहमद आहे. आदिल याला जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी ७ नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथून त्याला अटक केली. आदिलची चौकशी सुरू आहे आणि त्याने फरीदाबादमध्ये स्फोटके साठवल्याचे कबूल केले आहे. या घटनेनंतर आता रात्री दिल्लीत स्फोट झाल्याचे वृत्त आलेल्या एकच खळबळ उडाली आहे.
