महाड मध्ये सकाळ पासून चाललेल्या पावसामुळे मुंबई गोवा हायवे वर दरड कोसळली.

सविस्तर वृत्त : आज दिनांक ९ ऑगस्ट रोजी रात्री पासूनच महाड मध्ये पावसाची संततधार चालू होती. त्याचे रुपांतर सकाळी मुसळधार पावसामध्ये झाले. आणि काही ठिकाणी सकाळ पासूनच रायगड मध्ये पावसाला पुनः दमदार सुरुवात झाली. महाडमध्ये पावसाच्या सरी कोसळत असताना महाड येथील बिरवाडी मध्ये मुंबई महामार्गाजवळ असलेली दरड ऐन गाड्यांच्या वर्दळीमध्ये अचानक रस्त्यावर येण्यास सुरुवात झाली आणि बघता बघता दरडीचा काही भाग रस्त्यावर आला त्यामुळे मुंबई वरून येणाऱ्या गाड्या आणि गोव्यावरून येणाऱ्या गाड्या यांना वाहतूक पोलिसांकडून प्रसंगावधान साधून त्वरीत थांबवण्यात आले . पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली, आणि अनेक गाड्यांचे नुकसान होण्यापासून वाचले .
त्यामुळे महाड जवळील मुंबई गोवा महामार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पोलिसांकडून आणि प्रशासनाकडून रस्त्यावर आलेल्या मातीला,दगडांना बाजूला काढण्याचे काम सुरु करण्यात आले आहे जेणेकरून कोकणातील वाहतूक सुरळीत होऊन लोकांचा प्रवास सुखकारक होईल.
कोकणातील पावसाला पुन्हा एकदा आजपासून दमदार सुरुवात झाली आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या आणि प्रवास करणाऱ्या माणसांनी सतर्क राहणे गरजेचे आहे कारण अशा दरडी ठिकठिकाणी पडत आहेत.
