मुंबईत सीएनजी अभावामुळे वाहतुकीवर परिणाम

मुंबई ठाणे आणि नवी मुंबईत सीएनजी बंद झाल्यामुळे वाहतुकीवर  परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे सीएनजी बंद झाल्यामुळे सार्वजनिक वाहतूक कोलमडून पडली आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे

सविस्तर वृत : वडाळा परिसरातील गेल (GAIL) कंपनीच्या मुख्य नैसर्गिक वायू पाईपलाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील सीएनजी (CNG) पुरवठा रविवार दुपारपासून (१६ नोव्हेंबर २०२५) पूर्णपणे ठप्प झाला आहे. यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई महानगर क्षेत्रातील सार्वजनिक वाहतूक सेवा कोलमडल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई — या तिन्ही शहरांमध्ये सीएनजी पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. कारण आरसीएफ कंपाऊंडमधल्या मुख्य सीएनजी गॅस पाईपलाईनमध्ये मोठा बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. या बिघाडामुळे वडाळा येथील एमजीएलच्या सिटी गेट स्टेशनला जाणारा गॅस पुरवठा अचानक कमी झाला आणि त्याचे थेट पडसाद संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात उमटलेत. महानगर गॅस लिमिटेडने मात्र घरगुती ग्राहकांना प्राधान्याने पीएनजीचा पुरवठा सुरळीत ठेवला जाईल, अशी खात्री दिली आहे. पण सीएनजीवर धावणाऱ्या रिक्षा, टॅक्सी, बस आणि खाजगी वाहनांना या टंचाईचा मोठा फटका बसताना दिसत आहे. मुंबई महानगर प्रदेशातील जवळपास 133 सीएनजी पंपांवर याचा परिणाम झाला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील बहुतांश रिक्षा आणि टॅक्सी, तसेच बेस्टच्या काही बसेस सीएनजीवर चालतात

मुंबईतील जवळपास १३३ सीएनजी पंपांवर पुरवठा कमी दाबाने होत आहे. काही सीएनजी पंपावर पूर्णपणे पुरवठा बंद आहे. मोजक्या पंपांवर सीएनजी भरण्यासाठी खाजगी वाहने आणि टॅक्सींच्या दोन किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

सध्या गेल आणि एमजीएल प्रशासन बिघाड दूर करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहे. सार्वजनिक वाहतूक आणि उद्योगांवर कमीत कमी परिणाम व्हावा यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. महानगर गॅस लिमिटेडने मंगळवार दुपारपर्यंत (१८ नोव्हेंबर २०२५) सीएनजी पुरवठा पूर्ववत होण्याची शक्यता वर्तवली आहे. घरगुती पाईपलाईन गॅस (PNG) चा पुरवठा मात्र सुरळीत सुरू आहे. त्याला प्राधान्य दिले जाईल, असे एमजीएलने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *