पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करत दोन कांस्य पदके जिंकून इतिहास रचणारी नेमबाज मनू भाकेर हिच्या खांद्यावर भारताने मोठी जबाबदारी देत आता भारताच्या ध्वज वाहकाचा मान दिला आहे.
सविस्तर वृत्त : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतासाठी नेमबाज मनु भाकेर हिने दोन कांस्यपदकं जिंकत इतिहास घडवला आहे. मनूने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर पिस्तुलमध्ये कांस्यपदक जिंकून भारताचे खाते उघडले. भारतीय इतिहासातील ऑलिम्पिक मध्ये अशाप्रकारे पदक जिंकणारी ती पहिली भारतीय नेमबाज ठरली. त्यानंतर मनुने सरबज्योत सिंगसोबत 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये मिश्र सांघिक कांस्यपदकही पटकावले. मात्र, २५ मी एअर पिस्तूल स्पर्धेत मनू तिसरे पदक जिंकण्यापासून थोडी वंचित राहिली. आणि तिने चौथ्या क्रमांकावर मजल मारत आपल्या नावे करून घेतला.

तिच्या ह्या खेळातील यशाला बघून मनूवर भारतीय ऑलिम्पिक संघटनेने मोठी जबाबदारी सोपवली आहे. मनू भाकेर येत्या रविवारी पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या समारोप समारंभात भारताची ध्वजवाहक असेल. फ्रान्सच्या राजधानीत ११ ऑगस्ट रोजी समारोप सोहळा होणार आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (IOA) अधिकाऱ्याने सांगितले की, भारताकडून ध्वजवाहक म्हणून मनूची निवड करण्यात आली आहे. तिने उत्कृष्ट कामगिरी केली आणि ती यासाठी पात्र आहे.
यापूर्वी मनूने म्हटले होते की, भारतीय संघात असे अनेक खेळाडू आहेत जे माझ्यापेक्षाही अधिक पात्र आहेत परंतु त्यातूनही मला ही संधी दिली गेली हा माझ्यासाठी खरा सन्मान असेल. IOA ने अद्याप पुरूष ध्वज धारकाची घोषणा केलेली नाही. २६ जुलै रोजी झालेल्या उद्घाटन समारंभात टेबल टेनिस खेळाडू शरथ कमल पुरुष ध्वजवाहक आणि पीव्ही सिंधू महिला ध्वजवाहक होत्या. भारताची ध्वजवाहक म्हणून घोषणेनंतर मनूने ही माझ्यासाठी खूप मोठी सन्मानाची बाब असल्याचे म्हटले आहे.
तिने ट्विटरवर पोस्ट करत लिहिले की, ‘पॅरिस ऑलिम्पिकच्या समारोप समारंभासाठी भारताचा ध्वजवाहक म्हणून निवड होणे हा माझ्यासाठी सन्मान आणि विशेषाधिकार आहे. माझ्या हातात भारतीय ध्वज घेऊन एका उत्कृष्ट भारतीय तुकडीचे नेतृत्व करणे, जे जगभरातील लाखो लोक पाहणार आहेत, ही खरोखरच एक मोठी संधी आहे आणि जी मी नेहमीच जपेन. मला या सन्मानासाठी पात्र समजल्याबद्दल मी आयओएची मनापासून आभारी आहे आणि मी मोठ्या अभिमानाने भारतीय ध्वज फडकवण्यास उत्सुक आहे. जय हिंद!’
