भाईंदर खाडीत पहिला डबल डेक्कर पूल तयार केला जाणार …

सविस्तर वृत्त: मुंबईत एमएमआरडीएकडून मेट्रोचे अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत तसेच काही प्रकल्प हे एमएमआरडीए कडून पूर्ण होऊन काही प्रकल्पांचे काम चालू आहे, अशातच मुंबईतील वाढत्या लोकसंखेला आणि वाहतूक कोंडीला लक्षात घेऊन एमएमआरडीए कडून मुंबई ठिकठिकाणी मेट्रो प्रकल्प सुरु केले जात आहेत. अशातच एमएमआरडीएकडून आता मेट्रो-९ हा दहिसर ते मिरा-भाईंदर प्रकल्प २०२५ पर्यंत पूर्णत्वास नेण्याचा मानस आहे. अशातच वसई-विरार ह्या शहरांना जलद गतीने जोडणारा मार्ग म्हणजे भाईंदर मधून जाणारा खाडी महामार्ग आहे. कारण सध्याचा गुजरात महामार्ग हा सततच्या वाहतुकीच्या कोंडीत अटकलेला असतो प्रवाश्यांना फाउन्टन ते विरार जाण्यासाठी वाहतूक कोंडीचा सामना करत तीन ते चार तास प्रवासात घालवावे लागतात. ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन वसई –विरार चे आमदार हितेन्द्र ठाकूर, क्षितीज ठाकूर आणि आमदार राजेश पाटील यांनी या प्रकारणाचा पाठपुरावा करून ह्या प्रकल्पाला राज्य सरकारकडून तसेच एमएमआरडीए कडून हिरवा कंदील घेतला.
त्या नंतर वसई शहरात मेट्रो आण्यासाठी मेट्रो मार्ग-१३ ची घोषणा करण्यात आली या अंतर्गत मिरा-भाईंदर ते वसई-विरार हा मेट्रो मार्ग जोडण्याचा निर्णय घेण्यात आला.वसई-विरार ची एकूण लोक संख्या आणि मिरा-भाईंदर, वसईचे शहरीकरण लक्ष्यात घेऊन हा मार्ग हाती घेण्यात आला. मिरारोड ते विरार हा २३ कि.मी चा मेट्रो मार्ग असून त्यात २० स्थानके असणार आहेत मेट्रोला मान्यता मिळाल्यानंतर मार्गामध्ये खाडी असल्याने मेट्रो आणायची कोठून असा प्रश्न एमएमआरडीएला आला पण त्या साठी विविध पर्यायांचा विचार करण्यात आला होता सध्या (jnpt) बंदराचे काम चालू असता तेथेही मेट्रो प्रकल्प आहे, तेथून पालघरहून वसई पर्यंत मेट्रोला आणण्याचा पर्याय होता. परंतु त्या सर्व बाबींचा विचार केला असता सरकारला ही खूप खर्चिक बाब दिसून येत होती तसेच हा प्रकल्प वेळ खावू असल्याने भाईंदर खाडी वरील प्रस्ताविक पुलावरून मेट्रो आणावी असा प्रस्ताव आमदार हितेंद्र ठाकूर यांनी एमएमआरडीएला दिला .
या प्रस्तावावर विचार विनिमय करून आणि सर्व बाबी लक्षात घेऊन मान्यता देण्यात आली भाईंदर–नायगाव मेट्रो सहित खाडीपूल करण्याचा संरचनात्मक आराखडा तयारीचे काम प्रगती पथावर आहे. ह्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी ही मान्यता दिली आहे .भाईंदर, वसई पुलाचा आराखडा व संरचनात्मक आराखडा (structural design) प्राधिकरणाच्या दळणवळण विभागाकडे अग्रेसित करण्यात आलेला आहे. वसई खाडीवर मेट्रो-१३ च्या कामाच्या प्रस्तावाची कार्यवाही प्रगतीपथावर आहे. अशी माहिती एमएमआरडीएच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली, मिरा-भाईंदर या शहरात मेट्रोचे स्थापत्य काम चालू असून त्याच मार्गाला हा वसई-विरार महामार्ग जोडला जाणार आहे. आता भाईंदर खाडीतून प्रस्तावित पूल आणि मेट्रो ह्या एकाच ठिकाणाहून जाणार आहेत वर मेट्रो आणि खाली वाहनांसाठी पूल अशी त्याची रचना असणार आहे, हे दोन्ही मार्ग एकाच खांबावरून जाणार आहेत ह्या मुळे राज्य सारकारच्या खर्चात देखिल बचत होणार आहे. अशा प्रकारचा प्रकल्प हा राज्यातील पहिलाच प्रकल्प असेल असे सांगण्यात येत आहे. हया प्रकल्पाचा लाभ वसई-विरार च्या जनतेला मोठ्या प्रमाणात होणार आहे. ह्या मुळे वसई-विरारकरांची वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होईल.
