जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा धसका घेऊन सरकार झाले जागे उचलले पाऊल

सविस्तर वृत : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. येत्या 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील हे मुंबईत धडकणार आहेत. दरम्यन, या आंदोलनावर मनोज जरांगे पाटील ठाम असून मराठा समाजाच्या विजयाचा गुलाल उधळायचाच, असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलाय. अशातच मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे. येत्या 26 तारखेपर्यंत सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांचा विचार करावा, असं जरांगेंनी म्हटलंय. पुढे जरांगेंनी असंही म्हटलं की, मुंबईला जाण्याचं नियोजन पूर्ण झालं आहे. तयारी अंतिम टप्यात आहे. 27 ऑगस्टला मुंबईत जाण्यावर ठाम आहे. आता मराठ्यांनो ही झोपण्याची वेळ नाही. एक घर एक गाडी करून सगळे मुंबईकडे निघणार असल्याचीही मनोज जरांगे पाटील यांनी माहिती दिली
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या आगामी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाच्या विविध मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची नव्याने स्थापना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या समितीचे अध्यक्षपद आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. यापूर्वी ही जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्याकडे होती.
येत्या 29 ऑगस्टपासून मनोज जरांगे यांनी मुंबईत आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनापूर्वीच सरकार सक्रिय झाल्याचे हे संकेत आहेत. मराठा समाजाच्या शिष्टमंडळांसोबत चर्चा करण्याची महत्त्वाची जबाबदारी या 12 सदस्यीय समितीवर असणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनापूर्वी राज्य सरकारने उचललेले हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. या समितीच्या माध्यमातून सरकार मराठा समाजाच्या मागण्यांवर तोडगा काढू शकेल अशी अपेक्षा आहे. आता या समितीच्या माध्यमातून सरकार आणि आंदोलकांमध्ये नेमकी काय चर्चा होते, हे पाहणे महत्त्वाचे आहे
