महाविकास आघाडीकडून निवडणुकीसाठी मनसेला सोबत घेण्याची दाट शक्यता महायुतीचे टेन्शन वाढले

सविस्तर वृत : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. महायुती व महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढणार की स्वबळ अजमाविणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यातच आता महायुती मुंबईत एकत्रित तर अन्य ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे ठाकरे बंधूंची युती झाली तर महाविकास आघाडीचे काय होणार ? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यातच ठाणे महापालिका निवडणुकीसाठी आता महाविकास आघाडी वेगळे प्लॅनिंग करीत असून मनसेलासोबत घेत महायुतीपुढे मोठे आव्हान उभा करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे हे चार पक्ष एकत्र आल्यास हा ‘ठाणे पॅटर्न’ महायुतीसाठी धोक्याची घंटा? ठरण्याची शक्यता आहे
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची आज मुंबईत भेट झाली आहे. तर ठाण्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. विशेष म्हणजे या बैठकीत मनसे नेते अविनाश जाधव हे देखील उपस्थित होते. त्यामुळे राज ठाकरे हे ठाकरे गटासोबत आले तर महाविकास आघाडीच्या नेत्यांना कोणतीही हरकत राहणार नाही, असे संकेत मिळताना दिसत आहेत
आमची बैठक ही ठाण्यातील वाढता भ्रष्टाचार, ठाण्यातील पाण्याचा प्रश्न आणि वाहतूक कोंडी या विषयांवर पार पडली. या प्रश्नांवर सर्व विरोधक एकत्र येऊन जनआंदोलन उभं करण्याच्या तयारीत आहेत. महायुतीत जायचं की महाविकास आघाडीसोबत जायचं, याबाबतचे सर्वस्वी अधिकार राज ठाकरे यांना आहे. राज ठाकरे जो आदेश देतील त्या आदेशांचं पालन करणारी आम्ही लोकं आहोत”, अशी प्रतिक्रिया अविनाश जाधव यांनी दिली
मुंबईत तीन पक्षाची महायुती होईल, अशी घोषणा सीएम देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यासोबतच ठाणे महापालिकेत भाजप व अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणार आहे तर दुसरीकडे त्यांची एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे महायुतीमध्ये पडलेल्या उभ्या फुटीचा फायदा उचलण्याची तयारी आता विरोधकांनी सुरु केली आहे
